निवडणुकांवर बहिष्कार...हा आमचा कार्यक्रम नाही, लोकशाहीवर पूर्ण विश्वास : राहुल गांधी

Foto
नवी दिल्ली : निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकारी आता म्हणत आहेत की, ते यापुढे असे चालू ठेवू शकत नाहीत. ही संपूर्ण व्यवस्था कोसळण्यासाठी काही काळच राहिलेला आहे. आम्ही १०० टक्के पुराव्याशिवाय लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. निवडणुकीतील अनियमितता जनतेच्या निदर्शनास आणून दिल्या जात आहेत. जोपर्यंत नागरिकांना स्वतःला संपूर्ण व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची जाणीव होत नाही, तोपर्यंत त्यावर सातत्यपूर्ण चर्चा करणे, ही विरोधी पक्षांची रणनीती आहे, असे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार  राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. शिकागो विद्यापीठातील प्राध्यापक रॉबर्ट पेप यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी सांगितले की, आमच्यासाठी भारतीय लोकशाही पवित्र आहे. माझ्याकडे १००%...२००%...३००% पुरावा नाही, तोपर्यंत भारतीय लोकशाहीत समस्या आहे असे म्हणणेही मला अवघड वाटते. जे काही घडत आहे ते जनतेच्या निदर्शनास आणून देणे आमचे काम आहे. जनतेशी संवाद सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे,  असेही ते म्हणाले.

आम्हाला खुद्द निवडणूक आयोगामधूनच माहिती मिळत आहे
आम्हाला निवडणूक यंत्रणेत व्यत्यय आणायचा नाही. विरोधी पक्षाने निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया भारतीय जनतेच्या नजरेत अवैध ठरेल. आम्हाला ते नको आहे. आम्हाला आणि संपूर्ण विरोधी पक्षाला यामुळे मोठा फटका बसला असला तरी, आम्ही जाणीवपूर्वक असे पाऊल उचलणे टाळत आहोत. आम्हाला पूर्ण खात्री आहे, आणि मी तुम्हाला हे अगदी स्पष्टपणे सांगत आहे की आम्हाला खुद्द निवडणूक आयोगामधूनच माहिती मिळत आहे. ही संपूर्ण यंत्रणा थोड्याच दिवसात कोसळणार आहे. निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आता म्हणत आहेत की, बघा, आम्ही यापुढे असे व्यवस्था सुरू ठेवू शकत नाही. हा एक मोठा प्रवास राहिला आहे, पण आमच्यासाठी ती क्षमता आमच्या भारतीयत्वाचा गाभा आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, सर्व अनियमितता आणि नुकसान होऊनही विरोधी पक्ष निवडणुकांवर बहिष्कार घालणार नाही. कारण असे केल्याने लोकशाही रचना पूर्णपणे नष्ट होईल. आम्ही निवडणुकीत भाग घेणार नाही असे म्हटले तर भारतीय लोकशाही तात्काळ कोसळेल आणि आम्हाला भारतीय लोकशाहीचा मूळ पायाच नष्ट करायचा नाही, असे राहुल गांधी यांनी नमूद केले.